कहाणी सेल्फ केअर ची
ऐका अप्सरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं , ते अप्सरांचा नगर म्हणून प्रसिद्ध होतं . प्रत्येक घरात अप्सरा नांदत असे. मुलगी झाली कि तिचं कोडकौतुक करीत , उत्साहाने , आनंदाने शेजारी पाजारी उत्सव साजरा केला जाई. साक्षात गौर घरी यावी अशी तिची उस्तवार करीत. तिला शिक्षण दिले जाई . तिला विविध कला शिकवल्या जात. व्यवहारज्ञान , जीवन कौशल्ये , विवेक , सदाचार , आपुलकी , साधन व संपत्तीचे व्यवस्थापन या गुणांची शिकवण तीला दिली जाई . तिच्या सर्वांगीण विकासाकडे घरातील , प्रत्येक व्यक्तीचे अगदी मनापासून लक्ष असे. अशाप्रकारे सर्व गुणांचा योग्य समतोल साधून तीला वाढवीत , जपीत ....
मूळचीच सुंदर आणि हुशार त्याबरोबर विकसित झालेली मुलगी अगदी स्वर्ग लोकीची अप्सरा भासत असे.
मुलगी मोठी झाली कि सुयोग्य वर शोधून तिचा विवाह होत असे. विवाह प्रसंगी , ' माझ्या नियोजित वधूला मी प्रसंगी मैत्रिणीप्रमाणे वागवेल तर कधी मुलीप्रमाणे काळजी घेईल . सुखा समाधानाने संसार करेल. ' असे वचन वराकडून घेतले जात असे. आणि विवाहानंतर तिच्या नव्या जीवनाला सुरुवात होई.
' उतणार नाही मातणार नाही , घेतला वसा टाकणार नाही ' असे म्हणून ती संसार सुरु करी खरा ; पण समोर येणारी नवनवीन आव्हाने तिच्या सुस्वभावी व्यक्तिमत्वाची जशी काही परीक्षा च बघत.
अशीच एक अप्सरा , घरातले सण वार , ज्येष्ठ व कनिष्ठ यांची काळजी घेता घेता अगदी दमून गेली. मुलांचा अभ्यास , वाढलेल्या जबाबदाऱ्या , अपेक्षा यांनी ग्रासलेली ती एके दिवशी थोडा वेळ ' me time ' मिळावा म्हणून घराजवळील टेकडीवर गेली. तिथे विचारात असतानाच तिला भेटली एक स्त्री. त्या स्त्रीने उत्तम प्रतीचे कपडे घातले होते, चेहऱ्यावर तेज होते. अभिजात सौंदर्याची मूर्ती अशी ती स्त्री या अप्सरेला देवताच भासली. तिने नकळत त्या स्त्रीला हात जोडले. बाई तुम्ही कोण , कुठल्या , इथे आधी कधी दिसल्या नाहीत वगैरे चौकशी केली.
यावर ती स्त्री म्हणाली , मी इथेच असते , जवळच्या परिसरात राहते. माझं कुटुंब आहे , माझे माहेर देखील जवळ च आहे. भाऊ वहिनी , आई वडील प्रेमाने राहतात. सासू सासरे दीर मला चांगली वागणूक देतात , प्रसंगी मान देतात. माझ्या पतीचे माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि म्हणून माझ्या चेहऱ्यावर हा तजेला आहे, माझा चेहरा नेहमी उजळलेला दिसतो.
तिच्याबद्दल ऐकून , अप्सरेने तिला विचारले , हे तुम्हाला कसे शक्य झाले? मला बाई कामधामातून वेळ च मिळत नाही. तशी मी मूळची अप्सरा. लाडाकोडात वाढले , शिकले पण आता काही म्हणजे काही जमत नाही असं वाटतं . तुमच्यासारखं होण्यासाठी काही व्रत आहे का?
तशी ती बाई हसली . म्हणाली हो आहे. ' self care म्हणजे स्वतःची काळजी ' हेच ते व्रत.
हे व्रत कधी करावं? प्रत्येक महिन्यात एकदा करावं.
घरातील मंडळींना एकत्र बोलावून , त्यांच्या अपेक्षा समजून घ्याव्या. तुमच्या अपेक्षा त्यांना सांगाव्या.
कामाचे नियोजन करावे. सर्वांना जबाबदारी वाटून द्यावी. मोठ्यांना समयोचित मान द्यावा आणि प्रसंगी त्यांना समजावून सांगण्यात मागे पुढे बघू नये.
घरातील लहानांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी.
आपल्या आवडीच्या गोष्टींना वेळ द्यावा. नातेवाईकांइतकेच मित्र मैत्रिणी जमवणे आणि जोडणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे हे समजून घ्यावे.
छंद किंवा आपल्या आवडीच्या गोष्टींना वेळ दिल्यास अपराधीपणा मानू नये.
आरोग्याची काळजी घ्यावी आणि दिलखुलास जगावे.
एवढे बोलून ती स्त्री थांबली. तशी अप्सरा भानावर आली. व्रत जबाबदारीने पूर्ण करेल हे वचन दिलं . तिचं आयुष्य पुढच्या ६महिन्यात बदललं . ती पूर्वीसारखी अप्सरा दिसू लागली.
जशी ती अनामिक स्त्री अप्सरेला भेटली आणि तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली तशी तुम्हा आम्हा मिळो हि साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
Comments
Post a Comment