मॉनिटर
तुमची मुलं वर्गात मॉनिटर बनवलं नाही म्हणून रडतात का?
त्यांच्या एखाद्या गोष्टीचं शिक्षकांनी कौतुक केलं नाही कि त्यांना वाईट वाटतं का?
सारखं सारखं ठराविक २ -३ मुलांची नांव शिक्षक फक्त घेतात हे त्यांच्या लक्षात येतं का?
आणि हे सगळं झालं कि ते तुमचं डोकं खातात का?
मॉनिटर म्हणजे काय? मला का नाही केलं ? मी टीचर ला आवडत नाही का ?
हे प्रश्न ५० वेळा विचारतात का??
या सगळ्याचं उत्तर जर हो असेल तर या प्रश्नांमुळे तुम्हाला त्रास होत असेलच असं मी गृहीत धरते.
पण थांबा ..... वाईट वाटून घेऊ नका.
अतिशय विचारी आणि समंजस मुलांचे आई वडील असल्याबद्दल स्वतः चे अभिनंदन करा आधी!!
शाळेतील एक प्रसंग हमखास प्रत्येक मुलाच्या बाबतीत घडतो. शाळेत समजा मॉनिटर केलं नाही तर ' मी अजिबात शहाणा किंवा शहाणी नाहीये' असं त्यांना वाटू लागतं . काही मुलं रडतात , काही मॉनिटर शी कट्टी करतात.. काहींना शिक्षकांचा राग येतो.. अनेकविध प्रकार व्यक्त होण्याचे!
ते रडतात तेव्हा त्यांना विचारा , "तुला मॉनिटर का व्हायचंय ?"
त्यांचं उत्तर असतं , " जरा रागवता येतं न इतर मुलांना, मी बॉस होते न मग !"
लीडर किंवा मॉनिटर म्हणजे मुलांवर / मित्रांवर दादागिरी करायला मिळणे हि किती चुकीची व्याख्या नकळत मनावर बिंबवली जातेय!!
आणि शाळांमध्ये सुद्धा मॉनिटर कोणाला करतात, तर जो बोलघेवडा असेल , एक्सप्रेसिव्ह असेल किंवा खरं सांगायचं तर शिक्षकांनी दिलेलं प्रत्येक काम किंवा प्रोजेक्ट इ. अगदी जशीच्या तशी किंवा चोख करत असेल त्या मुलाला किंवा मुलीला.
जो मुलगा किंवा मुलगी तसं करणार नाही तो मॉनिटर च्या व्याख्येत बसत नाही!!!! मितभाषी मुलांना , समंजस मुलांना , मित्र मैत्रिणी जास्त असलेल्या मुलांना शक्यतो मॉनिटर निवडलं जात नाही!
म्हणजे चाकोरीबद्ध विचार करण्याची सवय नकळत मुलांना शाळेतून च लागते!! Out of the box विचार करायला गेलात तर पद नाही. आणि हेच पुढे नोकरीच्या ठिकाणी सुद्धा परिवर्तित होतं !! पदस्थ असणं म्हणजे अधिकार मिळणं हे विचार रुजायची हि पहिली पायरी!!
कधी कधी वाटतं आपला मुलगा /मुलगी या ठराविक साच्यामध्ये बसू शकत नसेल तर काय करावं?
मुलांना कसं सांगायचं हे कि अरे शाळेतून कौतुक मिळणं म्हणजे सगळं आयुष्य नाही! आणि आपल्याला समजत असलं तरी त्यांना सांगावं असं वय नसतं त्यांचं!!
हतबुद्ध व्हायला होतं अशा वेळी आणि 'तारे जमीन पर मधला डायलॉग आठवतो,
' जो दिखता है हमे लगता है वो है, और जो नहीं दिखता हमको लगता है वो नहीं है
लेकिन कभी जो दिखता है वो नही होता , और जो नहीं दिखता वो होता है!'
Comments
Post a Comment