दिनविशेष - गुरुपौर्णिमा आणि बाळ गंगाधर टिळक जयंती


दिनविशेष तर रोजच असतो पण काही दिन असे असतात जे खरच विशेष असतात. उदाहरणार्थ आजचा दिवस.. 

आज गुरुपौर्णिमा आहे आणि दुसरा विशेष दिवस म्हणजे लोकमान्य टिळक यांची जयंती. त्या निमित्ताने आज मला माहित असलेली एक गोष्ट इथे तुम्हाला सांगत आहे. 

हि गोष्ट आहे. संत गजानन महाराज आणि टिळक यांची. शिवजयंती च्या उत्सवाचे भाषण करण्यासाठी म्हणून अकोला वासियांनी लोकमान्य टिळक यांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमाच्या आयोजकांमध्ये या कार्यक्रमाला महाराजांना बोलवावे कि नाही यावरून बरीच चर्चा झाली आणि शेवटी त्यांना बोलवावे असे ठरले. या सभेला खापर्डे , अण्णा पटवर्धन , दामले , व्यंकटराव देसाई , कोल्हटकर , भावे असे अनेक मातब्बर उपस्तिथ होते. 

टिळकांनी त्यांच्या खास शैलीत भाषणाला सुरुवात केली आणि इंग्रज सरकारला उद्देशून खोचक शब्दांचा प्रयोग केला. या शब्दांमुळे अपमानित होऊन सरकारने त्यांच्यावर १२४ या कलमाखाली खटला भरला. 

टिळकांचे हे वाक्य काय होते? त्यांनी त्यांच्या भाषणात इंग्रज सरकारच्या शिक्षण पद्धतीवर टीका केली व म्हणले कि  भारतात सुशिक्षित लोक नाही तर गुलामीखाली जगणारे लोक निर्माण करणारे शिक्षण इंग्रज देत आहे. ज्या पिढीला स्वातंत्र्याची गोडी नाही त्यांच्या जगण्यात जीवन नाही अशा अर्थाचे शब्द त्यांनी भाषणामध्ये वापरले होते. शिक्षण कसे असावे तर जे समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना दिले आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला गुलामगिरीतून मोकळे केले. पण तशा प्रकारचे शिक्षण देण्याची कुवत या सरकारची नाही!! 


अर्थात च हे भाषण ऐकून टिळकांना अटक झाली आणि त्यांच्यावर खटला चालला आणि त्यांची रवानगी मंडाले येथील तुरुंगात करण्यात आली . 

 

याच सभेमध्ये गजानन महाराज उपस्थित होते , त्यांनी टिळकांबद्दल भाकीत वर्तवले कि असे बोलण्याने तुमच्या हातात बेड्या पडतील मात्र तरीही तुमच्यकडून सामन्यातीसामान्य कार्य घडेल. तेव्हा टिळकांना प्रश्न पडला कि तुरुंगात मी काय करणार? परंतु याच तुरुंगात त्यांनी गीतारहस्य हा अजरामर ग्रंथ लिहिला. 

भगवदगीता हा धर्मग्रंथ असला तरी तो एक दिशादर्शक मोटिव्हेशनल ग्रंथ आहे. त्यातून कोणाला कसा बोध होईल ते प्रत्येकाच्या ज्ञान व अनुभूतीवरून ठरते. 

लोकमान्यांनी मात्र हा ग्रंथ वाचून त्यावर सामान्य लोकांना समजेल अशी टीका केली आणि गीतारहस्य ग्रंथाचा जन्म झाला. आधुनिक काळातले ज्ञानेश्वर आणि त्यांची ज्ञानेश्वरी म्हणजे च लोकमान्य टिळक आणि गीतारहस्य. 

गजानन महाराजांनी टिळकांना प्रसाद म्हणून भाकरी खावयास दिली आणि त्यांनी दात नसतानाही सश्रद्ध भावनेने ती कुस्करून खाल्ली .

जीवनात आपल्याला योग्य संगोपन , संस्कार  त्याचबरोबर शिक्षण आणि ज्ञान मिळाले तर आपण आपले आयुष्य घडवू शकतो पण मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून प्राप्त परिस्तिथीत कसे समाधानी राहावे याबद्दलचे मार्गदर्शन करण्यासाठी सद्गुरू आपल्या पाठीशी हवेच!! हा बोध देणारी हि कथा श्री सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी अर्पण!



Comments