मासोळया

 आज लोकल ट्रेन मधून प्रवास करताना अचानक लक्षात आलं की या शहरतल्या सर्व सुंदर स्त्रिया माझ्या डब्यातून प्रवास करत आहेत. कोणाचे डोळे रेखीव तर कोणाचे केस लांब आणि कोणाचे ओठ सुरेख! या ललना माझ्याच डब्यात कशा बरं आल्या असतील! लेडीज डब्यामध्ये काही निराळी च जादू असते , एक वेगळीच खुमखुमी असते. या आत्मविश्वासाने झळकणार्‍या आणि मासोळीसारख्या चपळ स्त्रिया कधी सुळ्ळ्कन गाडीत शिरतात आणि कधी स्वतः ची ठरलेली जागा पटकवतात हे आपल्याला कळत ही नाही! यांच्यासाठी जागा मिळवणं जेवढ महत्वाच तेवढच उतरतांना नीटनेटक दिसणं सुद्धा; त्यामुळे बर्‍याच जणींची ट्रेन मध्ये अविरत सौंदर्यसाधना सुरू होते....हे सगळं पाहतांना मला फार मजा येत होती. कोणाचं नेलपेंट तिच्या टॉप शी पर्फेक्ट मॅच होतं! एकीने तर टिक-टॉक पिन पासून ते पायातल्या चपलेपर्यंत सगळं मॅचिंग केलं होतं. टिकली, ब्रेसलेट, हेयरबॅंड, आयशाडो, अंगठी, अॅंकलेट सगळं सगळं..... इतकच काय तिच्या मोबाइलचं कव्हर सुद्धा सेम रंगाचं होतं. कोणी समारंभाला जाण्यासाठी सगळा स्त्रीसाज लेऊन निघाली होती आणि कोणी cozy & comfortable शॉर्ट्स घालून बसली होती. असं सगळं वातावरण नवचैतन्य आणि विविधतेने भारलं असतांनाचं तिथे एका मोस्ट अवेटेड सेलीब्रिटी ची एंट्री झाली!!

 

 

तिच्याकडे काय नव्हतं! सुंदर दिसण्यासाठी स्त्रिया ज्याची अपेक्षा करतात ते सर्व होतं तिच्याकडे. नखशिखांत दागिने घेतलेली ती सौंदर्यावती दुसरी तिसरी कोणी नसून 'बांगडीवाली' होती.... या बांगडीवाली चं मला फार आश्चर्य वाटतं. तिच्या वस्तूंच तिला इतकं कौतुक असतं की एकवेळ "माल घेऊ नको ताई पण मालाला खराब बोलू नको" असं ती ठणकावून सांगू शकते, त्यामुळे घासघिस करण्याचा प्रश्न चं तिथे उरत नाही.... खरोखर पण तिच्याकडे असणारी कानातल्याची rangeआणि designs कुठेही मिळणार नाही असे असतात; प्रत्येकीकडे वेगवेगळे! funky, chunky, traditional, casuals, formals या सगळ्या प्रकारात तिच्याकडे कानातले आणि bracelets असतात. त्यामुळे, किती ही नाही ठरवलं तरी तिचा खोका हातात घेऊन पाहिल्याशिवाय मनाला समाधान मिळत नाही. नुसत्या पाहून शांत बसतात त्या बायका कुठल्या हो! एखाद दुसरी नोट खपते चं तिथे! या सेलीब्रिटी सोबत वेफर्सवाली, फुलवाली, कोळिण या side heroins असतात आणि त्यांनाही आपण भुलतो..

 

 

एखाद्या बिझी तरुणी ला ट्रेन मधला वेळ फार महत्वाचा वाटतो आणि मग ती लॅपटॉप उघडून काम करत बसते. कोणी देवाची स्तोत्रे वाचतात तर कोणी विणकाम करत बसतात. उरलेल्या काही घरी नवर्‍याला किवा मुलांना स्वयंपाकाची थोडी तयारी करून ठेवायच्या सूचना देत असतात. बर्‍याच जणी या वेळेचा सदुपयोग करून एक झोप काढतात. तर काही पक्क्या मुंबईकर मुली वारे चेहर्‍यावर झेलत मस्तपैकी दारात लटकत असतात.... हे उधाण वार्‍याच आयुष्य त्यांना मानवत.... 

 

जसं स्टेशन जवळ येतं तशा या रणरागिणी अलर्ट होतात. मोबाइल पर्स मध्ये जात, पुस्तकं बंद होतात, सेलीब्रिटी ही गायब होतात..... सगळी शस्त्र म्यान करून या दरवाज्यापाशी जाऊन उभ्या राहतात. जेवढ्या त्वेषाने जागा मिळवण्यासाठी आत घुसतात तेवढ्याच मोकळेपणाने आपली जागा दुसरीला देताना त्या कचरत नाहीत! पुन्हा दरवाज्यापाशी पुढची जागा पटकवतात आणि सटीओण आलं की लोकलच्या फिशटॅंक मध्ये विहरणार्‍या या मासोळया सुळ्ळ्कन मुंबईच्या महासागरात गायब होतात!!




Comments

Popular Posts