आजी

 खूप कर्तृत्ववान माणसाच्या घरातील इतर लोकांचे कर्तृत्व काहीसे झाकोळले गेल्यासारखे असते. त्यांनी दिलेले योगदान हे नेहमीच दुर्लक्षित असते. असे वर्णन करता येण्यासारखे माझ्या आजीचे आमच्या कुटुंबासाठी योगदान आहे. माझ्या आजोबांना सगळे बापू म्ह्णून बोलवत. त्यांचा स्वभाव हि तसाच होता.. मृदू, निर्मल आणि हट्टी.. त्यालाच सेवाभावी वृत्तीची जोड.. त्यांचे इतरत्र नेहमीच कौतुक होत असे, पण घरी मात्र त्यांची शिस्त वेगळी होती... अशा वेळी घरच्यांच्या गरजांना आणि आवडी निवडी ला कोणी प्राधान्य दिले असेल तर ते माझ्या आजीने ..

बराच रागीट आणि करारी स्वभाव असलेली माझी आजी आजोबांची भिडस्तपणाची बाजू नेहमीच सांभाळून घेत असे , त्यामुळे आम्ही कधी शांत आणि न बोलणारी अशी आजी बघितली च नाही..

आज लग्नानंतर ५ वर्षांनी आणि मुख्य म्हणजे मुलगा, नोकरी आणि घरच्यांच्या अपेक्षा यांचा समन्वय साधताना आजी तिच्यासारखी कशी घडली असेल याची कल्पना यायला नुसती सुरुवात च झाली आहे.

सोवळं ओवळ्याकडे जास्त लक्ष न देणारी माझी जगावेगळी आजी

बाबांना बरं नसलं कि बेचैन होणारी आजी

राघव रडायचा थांबवा म्हणून पणजोबांच्या नावाने अंगारा लावणारी आजी

आईला सून म्हणून कडू गोड अनुभव आणि अभिप्राय देणारी आजी

आत्याचा आधारस्तंभ असणारी माझी आजी

आणि आम्हा नात दुकली चे नवरे म्हणजेच नातजावई पाहायला मिळाले म्हणून सार्थक मानणारी आजी

राघव झाल्यावर ज्या अनेक गोष्टींची उकल झाली त्यातली च हि एक गोष्ट; ' जशी आईची गरज आयुष्यभर असते तसेच आजी आजोबांची सुद्धा असते.. भविष्यामध्ये , कसे वागायचे, प्रसंगांना तोंड कसे द्यायचे , हे सर्व आजी आजोबा असणाऱ्या भाग्यवान मुलांना आधीच माहित झालेले असते..!

जीवेत शरद: शतम आजी!

Comments