गरमागरम पण हलक फुलक : कर्नाटक पद्धतीचे कुटु आणि खजुराचे सार

 कर्नाटकी पद्धतीचे कुटू 

कुटू म्हणजे काय तर सांभार चा मोठा भाऊ ! जरा जास्त तिखट , मसालेदार. पण कांदा लसूण विरहित. 

प्रोटीन रिच आणि पटकन होणारी हि रेसिपी मी नुकतीच एका प्रसिद्ध फेसबुक गृप मध्ये करून दाखवली होती. त्याची रेसिपी मी इथे देत आहे. 

सांभार आणि कुटू मधला मुख्य फरक म्हणजे त्याचा घट्टपणा आणि मसाला. 

कुटू मध्ये भाज्यांचे प्रमाण जास्त असते. ते सांभार पेक्षा घट्ट असते आणि मुख्य म्हणजे त्याचा मसाला आपल्याला वेळेवर तयार करायचा असतो. 

सध्या थंडीमुळे सगळ्या भाज्या भरपूर मिळत आहेत , त्यामुळे आपण आत्ताच हा पदार्थ करून पाहायला हवा!


कुटू चे साहित्य :

१. तूरडाळ : दीड वाटी (किंवा १ वाटी तूरडाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ)

२. भाज्या ; ३वाट्या चिरून ( लाल भोपळा, बीन्स, गाजर , मटार, हवा असल्यास बटाटा आणि गवार)

३. गूळ : १ चमचा 

४. चिंचेचा कोळ : २ चमचे 

५. खवलेलं खोबरं  : पाव वाटी 

६. मीठ , कोथिंबीर 

मसाला बनवण्यासाठी :

१. चणा डाळ : २ चमचे 

२. उडीद डाळ : दीड चमचे 

३. कढीपत्ता : भरपूर 

४. मिरे : १ चमचा 

५. जिरे : १ चमचा 

६. बॅडगी सुकी मिरची : ४ 

फोडणीसाठी :

१. तेल : २ चमचे 

२. हिंग : १ छोटा चमचा 

३. कढीपत्ता 


कृती:

१. तूरडाळ आणि भाज्या चिरून कुकरमध्ये वेगवेगळ्या डब्यांमध्ये शिजवून घ्या. 

२. मसाला बनवण्यासाठी २ चमचे तेल घेऊन त्यात सर्व साहित्य रंग बदलेपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत भाजून घ्या. 

३. गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक पावडर करा. 

४. कढईमधे शिजलेली डाळघेऊन त्यात मसाला आणि थोडे पाणी मिक्स करून घाला. 

५. चांगली उकळी येऊ द्या. 

६. आता त्यात सगळ्या भाज्या घाला. 

७. आता जास्त शिजवायची गरज नाही. चिंच , गूळ  आणि मीठ टाका

८. खवलेले खोबरे घालून , नीट मिक्स करून गॅस बंद करा!

९. थोडेसे तेल लहान काढल्यात घेऊन त्यात हिंग , कढीपत्ता आणि एक मिरची टाकून ती चुरचुरीत फोडणी कुटूवर टाका. 


गरमागरम , प्रोटीन ने भरपूर आणि थंडीमध्ये उब निर्माण करणारे कर्नाटकी पद्धतीचे कुटू तय्यार!!!





खजुराचे सार 


खजुराचे सार  म्हणजे पौष्टिक , बलवर्धक , रक्तवर्धक , लोहवर्धक आणि चविष्ट पदार्थांचा मेळ . 

tangy , आंबटगोड चवीचे हे सार आजारी व्यक्तीला , गर्भवती स्त्रियांना , लहान मुलांना अतिशय उपयुक्त असे आहे!

साहित्य :

१. खजूर : बिया काढून १ वाटी 

२. चिंच : पाव ते वाटी 

३. गूळ : पाव वाटी 

४. खवलेलं खोबरं : पाव ते अर्धी वाटी 

५. तांदूळ पीठी 

६. मिरपूड : दीड चमचा

७. तूप , जिरे , कढीपत्ता, मीठ 


कृती : 

१. खजूर किमान २ तास भिजवून ठेवा. 

२. चिंच किमान अर्धा तास भिजवून ठेवा. 

३. वरील दोन्ही आणि खवलेलं खोबरं यांची मिक्सर मधून स्मूथ पेस्ट करून घ्या. 

४. कढईमधे थोडं तूप टाकून त्यावर हि पेस्ट घाला. 

५. त्यामध्ये जवळपास दुप्पट पाणी घाला. आणि एक उकळी येऊ द्या. 

६. तांदुळाची पिठी पाण्यात कालवून त्याची पेस्ट टाका. यामुळे घट्टपणा येईल. 

७. चवीचा अंदाज घेऊन मीठ आणि गूळ घाला. 

८. एका लहान काढल्यात तूप गरम करून त्यात जिरे , कढीपत्ता यांची फोडणी करा आणि सारामध्ये फोडणी द्या. 

९. मस्त चर्रर्र आवाज आला म्हणजे फोडणी छान झाली!!


गरमागरम खजुराचे सार  रेडी!!!


छान छान  सर्विंग बाउल मध्ये सर्व करा. 



Comments