तुकडा पडलेले शिंपले

समुद्रकिनाऱ्यावर चालत चालत ती सवयीने चांगले शंख शिंपले कुठे दिसतायेत का ते बघत होती.
जरा चांगले वाटलेले उचलून बघून नंतर नाही आवडले तर खाली टाकून देत होती.
लहानपणापासून हि शंख शिंपले गोळा करायची सवय इतर अनेक मुलींप्रमाणे तिलाही होती. जिथे घराचे बांधकाम सुरु असेल , तिथे जाऊन वाळूच्या डोंगरातून शंख शिंपले गोळा करायचे तिचे आवडीचे काम ..
नंतर नंतर बांधकामाच्या जागेवर जाणे बंद झाले , वाळूच्या ऐवजी रेती वापरली जाऊ लागली तसा कालानुरूप तो छंद मागे पडला.
आज अनेक वर्षांनी जेव्हा समुद्रकिनाऱ्यावर जायला मिळाले तेव्हा ती स्वतः ला शंख गोळा करण्यापासुन थांबवू शकली नाही.
चांगले दगड , रंगीत , ओबडधोबड , दुरंगी शिंपले ; खजिना च होता. रंगीबेरंगी सुळके असलेले मऊमऊ दगड. त्यात स्फटिकाचे दगड पण होते , ज्यांना ती लहानपणी खडीसाखरेचे दगड म्हणायची.
खरच खडीसाखर वाटावे असे ते दगड! गोड चव आहे कि काय हे पाहण्यासाठी एकदा दोनदा चाखून हि पाहिले होते!
ती हरखून गेली. खूप दिवसांनी बालपण किनाऱ्यावर सापडलं होतं . शंखासारखं आयुष्य वेटोळं वेटोळं होतं एका विशिष्ट लयीत स्थिरावलं होतं . आनंदात होती ती. शिंपल्यासारखी मिटलेली ती , आता , खूप खुलली होती. आधीसारखी मितभाषी किंवा शिष्ठ राहिली नव्हती. मिटलेली शिंपली उघडून तिचे अंतरंग आता चेहऱ्यावर आपसूक उमटत असत.
कधी कधी तिला पूर्वीसारखं शांत पुस्तक वाचत , खात , कॉफी पीत पीत ,, गाणी ऐकत दिवस घालवायला आवडायचं. पण आता ते शक्य नव्हतं . बदलेली जीवनशैली हीच आता खरी होती. तिच्यातली ती वेगळी होती.
पूर्वी शंख शिंपले वेचताना तिला एकदातरी शिम्पल्याची पेटी मिळावी असं नेहमी वाटायचं. आणि तुकडा झालेले शिंपले तर नकोच असायचे. कारण ते कुठे खरे खरे शिंपले वाटतात? ते शिंपले आहेत हे कळत पण नाही. आणि असे तुटके मुटके नको बाबा. मोती तर पेटीमध्ये मिळतो. मला पण पेटीच हवी.
आज मात्र शिम्पल्याचा तुकडा बघितल्यावर तिला खूप सुंदर वाटला तो. एखादा कॅनवास च. इतके दिवस का बरं मी नाकारलं याला? पुर्ण शिंपला मिळवण्यासाठी लागणारा वेळ , कष्ट आणि कमी कमी होत जाणारा उत्साह याचा मेळ बसवताना जेमतेम एक पेटी हाती लागली कधीतरी आणि असे अनेक वेगवेगळ्या आकाराचे , छटांचे हे तुकडे मी उगीच टाकून दिले. काय माहित ते जोडून जोडून एक सुंदर आकृती तयार करता आली असती.
शिंपल्याच्या तुटलेल्या तुकड्यावरून जीवनाचं तत्वज्ञान समजलंय कि जीवनातल्या अनुभवांवरून शिंपल्याच्या तुकड्याचं रूप नव्याने पाहता आलंय याचा विचार करत ती किनाऱ्यावरून पुढे पुढे चालत राहिली..



- विभावरी विटकर 

Comments

Popular Posts